वै. ह.भ.प.बापूसाहेब महाराज वालुरकर यांची ३२ वी पुण्यतिथी
संत हे कायम संसाररुपी सागरात अडकलेल्या सामान्य माणसाला ईश्वराचे अस्तित्व दाखवून देतात एवढेच नव्हे तर हाताला धरून सर्व सामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी योग्य दिशा दाखवतात म्हणुन संत म्हणजे कल्पतरू असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. राम महाराज पिंपळेकर यांनी आशीर्वचन पर बोलताना केले आहे.
तालुक्यातील वालुर येथील श्रद्धास्थान वै.ह.भ.प.बापूसाहेब महाराज वालुरकर यांच्या ३२ व्या पुण्यतिथी निमित्त येथील केशवराज बाबासाहेब विद्यालयात आयोजित कीर्तन सोहळ्यात रविवार ७ एप्रिल रोजी उपदेशपर बोलत होते.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पुण्यवंत व्हावें। घेतां सज्जनांची नावें ।। नेघे माझे वाचे तुटी । महा लाभ फुकासाठी ।। विश्रांतीचा ठाव । पायीं संतांचिया भाव।तुका म्हणे पापें ।जाती संतांचिया जपें ।। या अभंगावरील विस्तृत विवेचन करताना ते म्हणाले की ,संत निरपेक्ष ,निरामय स्नेह देतात.संतांचे नुसते नाव घेतले तरी माणुस पुण्यवान होतो.संतांची थोरवी वर्णन करण्यात वाणी अपूरी पडते.संतसंग हा सहज मिळणारा मोठा लाभ आहे.संतांच्या पायी श्रद्धा ठेवणे हा आयुष्यातील विश्रांतीचा ठाव आहे.संतांच्या नावाच्या घोषाने आयुष्यातील पापे नाहीशी होतात असे प्रतिपादन त्यांनी केले.
वालुर येथील सदगुरु श्री.धुंडा महाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेचे बाल वारकऱ्यांनी सेवा दिली.