
परभणी संतोष शिंदे :
मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. या योजनेला महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आतापर्यंत १.३१ कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. राज्याच्या अर्थ मंत्रालयानं योजनेवर खर्चाची आणि सरकारी तिजोरीत असलेल्या खडखडाटाची कल्पना देत योजनेला हरकत घेतली.
पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी योजनेला निधीची कमतरता भासणार नसल्याची ग्वाही दिली.
राज्यातील १ कोटी ३१ लाख ९१ हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत. योजनेसाठी प्रत्येक दिवशी हजारो महिलांचे अर्ज येत आहेत. राज्य सरकारकडून पात्र महिलांच्या निवडीसाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून समित्यांची स्थापना केली जात आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट आहे. अर्ज करण्यासाठी अद्याप महिन्याभराची मुदत शिल्लक आहे. त्यामुळे अर्जदारांची संख्या वाढू शकते.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत गरीब महिलांना महिन्याकाठी १५०० रुपये देण्यात येतील. योजनेचा लाभ १ जुलैपासून दिला जाईल. योजनेचा पहिला हफ्ता १५ ऑगस्टला देण्यात येईल. योजनेचा लाभ २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांना मिळेल. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळेल.
लाडकी बहीण योजनेसाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. मध्य प्रदेशात दोन दशकांपासून भाजप सरकार असताना गेल्या विधानसभा निवडणुकीआधी लाडली बहेना योजना सुरु करण्यात आली. त्यामुळे भाजपला महिलांनी भरभरुन मतदान केले. या योजनेमुळे अँटी इन्कमबन्सी टाळण्यात भाजपला यश आले. विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळालं. आता महाराष्ट्रातही त्याचीच पुनरावृत्ती होईल अशी आशा महायुतीला आहे