सेलूत टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र राज्य निवड चाचणी ला प्रतिसाद…
(सेलू)मैदानी व सांघिक खेळामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त, शारीरिक क्षमता, जय-पराजय,जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम ही जीवन मूल्ये विकसीत होतात तसेच मैदानातून जीवन जगण्यासाठी उर्जा मिळते त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळ व शिक्षणाची कास धरून आपले करीअर घडवावे असे आवाहन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी यांनी केले.
महाराष्ट्र राज्य टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन व परभणी जिल्हा टे. व्हॉ. असो. यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन विद्यालयाच्या मैदानावर राज्य टेनिस व्हॉलीबॉल पुरुष- महिला निवड चाचणी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी कार्यकमाचे अध्यक्ष म्हणून जयप्रकाश बिहाणी बोलत होते.
या वेळी उद्घाटक म्हणून उद्योजक नंदकिशोर बाहेती, तर प्रमुख पाहुणे म्हणून टेनिस व्हॉलीबॉलचे राज्य कार्यकारीणी सदस्य संजय ठाकरे विभागीय सचिव रामेश्वर कोरडे, जिल्हा कोषाध्यक्ष चंद्रशेखर नावाडे, मुख्याध्यापक संतोष पाटील, प्रा.नागेश कान्हेकर, अशोक वानरे , जिल्हा सचिव सतीश नावाडे यांची उपस्थिती होती. या वेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू प्राची कडगे, राहूल पेटकर , सिध्दार्थ लिपने व निलेश माळवे यांचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या निवड चाचणी स्पर्धेत मुंबई, लातूर, पुणे, अमरावती, सांगली, परभणी, हिंगोली , अकोला , बीड, नांदेड आदी जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यसचिव गणेश माळवे , सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर प्रा. नागेश कान्हेकर यांनी आभार मानले. निवड समिती सदस्य रामेश्वर कोरडे व संजय ठाकरे यांनी 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान बंगळूरू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पुरुष व महिला संघाची निवड केली. सामनाधिकारी म्हणून राज सोनपसारे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीते साठी अनुराग आमटी , निलेश माळवे, प्रसाद महाले, आर्यन गायके, बालाजी दहिवाल मस्के आदींनी परिश्रम घेतले. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंना कोहीनूर रोप्स च्या वतीने स्पोर्ट कीट उपलब्ध करून देण्यात आले.