पालखी मिरवणूक, सजीव देखाव्यांसह महिलांचा मोठा सहभाग
सेलू / प्रतिनिधी
भगवान श्री परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त सेलू् शहरात शुक्रवार १० मे रोजी सायंकाळी श्री परशुरामांच्या भव्य प्रतिमेसह पालखी मिरवणूक व शोभायात्रा उत्साहात संपन्न झाली.
येथील श्री परशुराम जन्मोत्सव समिती, सर्वशाखीय, बहुभाषिक ब्राह्मण समाज बांधवांच्या वतीने भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शुक्रवारी सकाळ पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जन्मोत्सवानिमित्त श्री गायत्री माता मंदिरात सकाळी सात वाजता भगवान श्री परशुराम यांच्या मूर्तीला महाअभिषेक करण्यात आला.यावेळी शहरातील वेदशास्त्र संपन्न ब्रम्हवृदांच्या उपस्थितीत महाभिषेक व मंत्र उच्चारासह जय घोषांनी परिसरात उत्साह संचारला होता.
शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता
श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून ढोल व ताशांच्या गजरात शोभायात्रा व पालखी मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली. मंदिर संस्थानचे विश्वस्त वामनराव मंडलिक व सुधीर मंडलिक यांच्या हस्ते भगवान श्री परशुराम यांच्या मूर्तीचे तसेच पालखीचे पूजन करण्यात आले. शहरातील टिळक पुतळा ,सुभेदार गल्ली ,फुलारी गल्ली ,बालाजी मंदिर ,सारंग गल्ली ,मठ गल्ली ,जवाहर रोड ,क्रांती चौक मार्गे रात्री ९ वाजता श्री.केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर परिसरात महाआरतीने शोभायात्रेची सांगता झाली. शोभायात्रेच्या प्रारंभी बँड पथक ,अश्वस्वार बाजीराव पेशवे यांच्या वेशात अभिजित कुलकर्णी तसेच निशिकांत पाटील व प्रियंका पाटील यांनी बाजीराव पेशवे व काशीबाई यांचा सजीव देखावा सादर केला .श्री.भगवान परशुरामाचे परशु अस्त्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.हलगी पथक व महिला मंडळाचे लेझीम पथक ,श्री.भगवान परशुरामांची पालखी यामुळे शोभायात्रेत अध्यात्मिक उत्साह संचारला होता.श्री.भगवान परशुरामांची ०८ फुट उंच मूर्ती शोभायात्रेतील मुख्य आकर्षण ठरली. तब्बल ०३ तास चाललेल्या शोभायात्रेत शहरातील विविध राजकीय,सामाजिक ,सांस्कृतिक,वैद्यकीय ,न्यायालयीन ,पत्रकारिता ,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह शहरातील नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.मिरवणुकीत सहभागी सर्व नागरिकांसाठी सुभेदार गल्ली ,फुलारी गल्ली व मारवाडी गल्लीत पिण्याचे पाणी ,अल्पोपहार व थंड पेयाची व्यवस्था करण्यात आली होती.