
साडेचार लाख रूपयांचा अपहार करून फसणूक केल्याप्रकरणी गुन्हा
सेलू जि.परभणी (प्रतिनिधी) : परळी वैजनाथ येथील राजस्थानी मल्टिस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेडच्या सेलू शाखेत फिर्यादीची फसवणूक करून त्याच्या ४ लाख ५० हजार रूपये रकमेचा संगनमत करून अपहार केला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष चंदुलाल मोहनलालजी बियाणी, पदाधिकारी व शाखाधिकारी अशा सहा आरोपीसह सोसायटीविरूद्ध विविध कलमांखाली सेलू पोलिस ठाण्यात सोमवारी. १० फेब्रुवारीरोजी अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अभय लक्ष्मीकांत सुभेदार (वय ५० वर्षे, रा.सुभेदार गल्ली, सेलू जि.परभणी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अभय सुभेदार यांनी परळी वैजनाथ येथील राजस्थानी मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेडच्या सेलू शाखेत बचत खाते के ६४/५ मध्ये १ सप्टेंबर २०२३ रोजी ४ लाख ५० हजार रूपये अनामत ३० दिवसांकरिता मुदत ठेव म्हणून ठेवली होती. मुदत संपल्यानंतर बँकेत रक्कम काढण्यासाठी ते गेले. रितसर विड्राल फार्म भरुन दिला असता आरोपितांनी अरेरावीची भाषा वापरुन शिवीगाळ करुन धमकी दिली. “आम्ही तुमचे पैसे देवु शकत नाही. तुम्हाला काय करायचे ते करा.” असे सांगून नियोजनबध्द कट रचून फसवणूक करुन त्यांच्या रकमेचा अपहार केला. यावरून न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी रात्री साडे आठ वाजता राजस्थानी मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी तसेच अध्यक्ष चंदुलाल मोहनलालजी बियाणी (रा.लातूर), उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती, सहसचिव पी.डी.अग्रवाल, कोषाध्यक्ष विजय प्रकाश लड्डा (सर्व रा.परळी वैजनाथ जि.बीड), शाखाधिकारी नंदकिशोर सोमाणी (रा.स्टेशन रोड, सेलू जि. परभणी) यांच्याविरूद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीतर्फे ॲड.लहेरचंद खोना यांनी काम पाहिले.