निवडणूक लोकशाही विरुध्द हुकुमशाही उध्दव ठाकरे यांचा परभणीतून हल्लाबोल : पावसात जंगी जाहीर सभा.

परभणी | रोहित झोल

परभणी लोकसभेच्या या निवडणूका अत्यंत महत्वपूर्ण आहेत. विशेषतः ही निवडणूक लोकशाही विरुध्द हुकुमशाही अशीच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांनी लोकशाही वाचविण्याकरीता महाविकास आघाडीच्या मागे भक्कम ताकद उभी करावी, असे आवाहन शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री परभणीतील जाहीर सभेतून केले.
परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या निवडणूक प्रचारार्थ येथील स्टेडिअम मैदानावर मंगळवारी (दि.23) आयोजित केलेल्या जोरदार जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार श्रीमती फौजिया खान, माजी मंत्री आमदार राजेश टोपे, उमेदवार संजय जाधव, आमदार सर्वश्री सुरेश वरपुडकर, राहुल पाटील, राजेश राठोड, माजी आमदार सर्वश्री विजय गव्हाणे, सौ. मिराताई रेंगे, सुरेशदादा देशमुख, विजय भांबळे, सुरेश जेथलिया, सितारामजी घनदाट, संतोष सांबरे, जिल्हाप्रमुख विशाल कदम, ए.जे. बोराडे, डॉ. विवेक नावंदर, सिध्दार्थ हत्तीअंबीरे, भगवानराव वाघमारे, गंगाप्रसाद आनेराव, अतूल सरोदे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ठाकरे यांनी भर पावसात केलेल्या आपल्या अल्प भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका केली. मोदी यांचे नाणे, मोदी यांचा चेहरा या महाराष्ट्राच्या निवडणूकीत यंदा चालणारा नाही, हे ओळखूनच या मंडळींनी हिंदुर्‍हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरण्याचा केविलवाना प्रयत्न सुरु केला आहे, असा आरोप केला. आपल्या कुटूंबियांवर घराणेशाहीचा आरोप केला जातो आहे. हो, आपणास अभिमान आहे, आपण हिंदुर्‍हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहोत, आपण घराणेशाहीबद्दल विरोधकांना बोलण्याचा काडीमात्र अधिकार नाही, घराणेशाहीबद्दल जनताच ठरवेल, असे नमूद करतेवेळी ठाकरे यांनी तुम्ही आमच्या घराणेशाहीबद्दल बोलत आहात आम्ही तुमच्या एकाधिकारशाहीबद्दल सातत्याने निश्‍चितच बोलू. गेल्या दहा वर्षांपासून आपण सत्तेच्या माध्यमातून एकाधिकारशाही चालविली आहे. त्या माध्यमातूनच आपण उध्दव ठाकरे यांना संपविण्याचा प्रयत्न करताहात, महाराष्ट्रातील मर्द मराठा हा आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना संपविण्याचा मोदी शहांनी वल्गना करु नयेत, दिल्लीत बसून आपण देशभर विरोधकांविरोधात कारवाया करत आहात, आपण म्हणून ती दिशा अशी भाषा करत आहात. वास्तविकतः आम्ही आपणास प्रेमानेसुध्दा मिठी मारली, आता अंगावर आला आहात, तेव्हा आम्ही वाघ नखे काढण्यास कचरणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.या महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या सभेत भाजपाची पिलावळ महिलांबद्दल अपशब्द वापरत आहेत. परंतु, पंतप्रधान महिलांविरुध्दचा हा अवमान मूकपणे सहन करत आहेत. सुप्रिया सुळेंना शिवी देण्यापर्यंत विरोधकांनी मजल गाठली आहे. विरोधकांची ही पातळी म्हणजे असंस्कृतपणाचे लक्षण आहे, असे नमूद करीत ठाकरे यांनी भाजपला आता बोलण्यासारखे मुद्दे राहिले नाहीत. गेल्या दहा वर्षांपासूनची रटाळ मालिका आता बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या निवडणूकीच्या माध्यमातून जनताच ‘अब की बार भाजप तडीपार’ असा नारा देवू लागली आहे, असे ठाकरे म्हणाले.

जाधव व पाटील आपले मावळे…
आपल्यावर, शिवसेनेवर अनेक संकटे आली परंतु, या संकटांना आपण, शिवसेना कधीच घाबरली नाही. संकटे परतवणे, संकटावर मात करणे हे छत्रपतींच्या मर्द मावळ्यांनी सातत्याने दाखवून दिले आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी म्हटले. खासदार संजय जाधव व आमदार डॉ. राहुल पाटील हे दोघे आपले मावळे आहेत. तेही कधी कोणाचेही मिंधे झाले नाहीत, या शब्दात ठाकरे यांनी या दोघांचे कौतूक केले.

परभणीकर पैशाने विकले जाणारे नाहीत…
परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो निश्‍चितच अबाधित राहील. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर या जिल्ह्याने सातत्याने प्रेम केले आहे. याही निवडणूकीत तो मतदार निश्‍चितच आशिर्वादरुपाने पाठीशी उभा राहिल, अशी ग्वाही ठाकरे यांनी या सभेतून दिली.
विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा… बंडू जाधव हे अत्यंत निष्ठावान आणि कट्टर असा मावळा आहे. दिल्लीतसुध्दा तो लढतो आहे. या निवडणूकीतूनसुध्दा जाधव यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, ते करतेवेळी विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा, असे आवाहन ठाकरे यांनी या सभेतून केले. परभणीकरांचा निर्धार पक्का आहे. केवळ या निवडणूकीत निशाणी बदलली आहे, ती निशाणी मतदारांनी लक्षात ठेवावी, असेही आवाहन केले.
भर पावसातील या सभेस मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button