ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरूक राहावे ..

@ डॉ विलास मोरे यांचे प्रतिपादन..

सेलू :- आजच्या स्पर्धेच्या युगातील ग्राहक हा बाजारपेठेत होणाऱ्या खरेदी विक्री व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे. परंतु ग्राहकाला आपली फसवणूक होऊ नये यासाठी नेहमी जागरूक राहावे लागेल. 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो, या दिवसापुरतीच जागरूकता ग्राहकांनी न ठेवता, वर्षभर ग्राहकांनी जागरूक राहून आपल्या हक्काचे संरक्षण करावे, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांताचे अध्यक्ष डॉ विलास मोरे यांनी सेलू येथे केले.

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालय सेलू, अखिल भारतीय ग्राहक पंचायत सेलू व नूतन महाविद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात एक जानेवारी रोजी ग्राहक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर विलास मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य उत्तम राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, वजन मापे निरीक्षक सचिन खेडेकर, पुरवठा निरीक्षक मदन यादव, ऋषिकेश पौळ, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्या मंजुषा कुलकर्णी, अखिल भारतीय ग्राहक पंचायत परभणी जिल्हा सहसचिव सुनील गायकवाड, तालुकाध्यक्ष सतीश जाधव, तालुका संघटन मंत्री शुकाचार्य शिंदे, उपाध्यक्ष गंगाधर कान्हेकर, प्रा के डी वाघमारे, भरत नाना बोराडे, लता गिल्डा, निर्मला लिपणे यांच्यासह गॅस एजन्सी धारक, पेट्रोल पंप चालक, राशन दुकानदार, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ग्राहक कायद्याने ग्राहक म्हणून जे हक्क व अधिकार दिलेले आहेत याचा अभ्यास करून जीवनात आपले अनेक कर्तव्ये पार पाडत असताना ग्राहक म्हणून स्वतः सजग राहण्याबरोबरच इतरांनाही त्यांचे हक्क व कर्तव्य विषयी जागरूक केले पाहिजे. कोणाचीही ग्राहक म्हणून फसवणूक होणार नाही यासाठी ग्राहक हक्क कायद्याविषयी प्रत्येकांना माहिती राहावी यासाठी जनजागृती मोहीम राबवावी, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक संघटनेचे देवगिरी प्रांताध्यक्ष डॉ विलास मोरे यांनी केले.


पोलीस निरीक्षक श्री बोरसे म्हणाले की आज सायबर फसवणूक सर्रासपणे होत असताना दिसत आहे. सर्वात वाईट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने सायबर गुन्हेगार त्यांची कार्यपद्धती इतकी परिपूर्ण करत आहेत की ग्राहकांना बनावट ओळखणे जवळजवळ अशक्य होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. ईमेल, व्हॉट्सॲप किंवा एसएमएसवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक करणे किंवा कोणीही पाठवलेले ॲप्लिकेशन डाउनलोड करणे टाळा असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संजय पिंपळगावकर तर आभार सतीश जाधव यांनी मानले

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button