१६३ वर्षाची परंपरा…
सेलू / प्रतिनिधी
तालुक्यातील वालुर येथील वै. अण्णासाहेब महाराज वालुरकर दिंडीचे आळंदीकडे प्रस्थान दि.२५ जून रोजी वै.अण्णासाहेब महाराज समाधीस्थान वालुर येथून झाले.१६३ वर्षाची परंपरा असलेल्या या दिंडीच्या भक्तांनी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या जयघोषाने दिंडी सोहळ्याची रवानगी करण्यात आली.कैवल्यसम्राट चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे श्री.संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी सोहळ्यात माऊलींच्या रथामागे १५ क्रमांकावर वालुरकर दिंडीचा क्रमांक आहे.जिल्ह्यातील हजारो वारकरी दिंडीत सहभागी होतात.
वै.अण्णासाहेब महाराज वालुरकर यांनी दिंडीचा श्री गणेशा केला.त्यानंतर त्यांचे सुपुत्र वै.बापूसाहेब महाराज वालुरकर यांनी दिंडीची धुरा समर्थपणे सांभाळली व फडाचा विस्तार केला.आपुलकी,माया व अध्यात्म यांची सांगड घालून हजारो वारकऱ्यांना त्यांनी विठ्ठल भक्तीच्या प्रवाहात आणले.वै.ह.भ.प. बापूसाहेब महाराज यांना त्यांचे थोरले बंधू स्वातंत्र्यसैनिक कै. बालासाहेब चौधरी व धाकटे बंधू स्वातंत्र्यसैनिक कै.रावसाहेब चौधरी यांची मोलाची साथ लाभली.
सध्या वै.बापूसाहेब महाराज यांचे सुपुत्र ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज दिंडीचे नेतृत्व करीत आहेत.ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज यांचे जेष्ठ वद्य ७ शके १९४६ दि.२८जून शुक्रवार रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथे माऊलींच्या मंदीरात व जेष्ठ वद्य १२शके १९४६ दि.०३जुलै बुधवार रोजी सासवड येथे माऊलींच्या पालखी समोर मानाचे कीर्तन होईल.
माऊलींच्या दिंडी सोहळ्यात वै.अण्णासाहेब महाराज वालुरकर दिंडीला दोन मानाचे कीर्तन आहेत ही परभणी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.