अहिल्यादेवींच्या कारकीर्दीत राष्ट्रीय व सामाजिक कार्यास प्राधान्य – निलेश गद्रे

सेलू दि.
अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतःच्या राजकीय कारकीर्दीत सांसारिक जीवनातील वैयक्तिक समस्यां ऐवजी सांस्कृतिक व धार्मिक कार्यातून राष्ट्रीय व सामाजिक दृष्टीकोन जोपासण्याला प्राधान्य दिले.असे मत महाराष्ट्र-गोवा राज्य समरसता मंचचे संयोजक श्री.निलेश गद्रे यांनी येथील एका कार्यक्रमात व्यक्त केले.अध्यक्षस्थानी अंबाजोगाईच्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डाॅ.हेमंत वैद्य होते.तर व्यासपीठावर सर्वश्री चंद्रकांत मुळे, हरिभाऊ चौधरी व उपेंद्र बेल्लूरकर यांची उपस्थिती होती.

        सेलूतील नूतन विद्यालयाच्या रा.ब.गिल्डा सभागृहात दि.२१फेब्रूवारी रोजी सायंकाळी  आयोजित स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की,बालपणापासून साहस व नेतृत्वाचा गुण अंगी असलेल्या अहिल्यादेवींनी माळवा प्रांताचा कारभार स्वीकारल्यानंतर मुघलांच्या गुलामगिरीतून रयतेला मुक्त करण्याची मोहीम राबविली.आदर्श व निष्पक्ष न्यायव्यवस्था,अर्थव्यवस्थेचे नियोजन करीत शेतसारा कमी केला.काशी विश्वेश्वर,सोरटी सोमनाथ,रामेश्वर आदि बारा ज्योतिर्लिंग मंदिरासह मुघलांनी क्षिती पोचविलेल्या देशातील मंदिरांचा स्वतःच्या निधीतून जिर्णोद्धार केला ,विस्तृत घाट बांधले .सांस्कृतिक व  धार्मिक व्यवसूथापनातून सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.अहिल्यादेवीच्या जीवन चित्रातील अनेक साहसी, रोमांचकारी व प्रेरक प्रसंगांचे दाखले देत त्यांच्या कार्याचा गौरव आपल्या भाषणातून केला.

व्याख्यानमालेच्या या दुसऱ्या सत्राचा प्रारंभ अहिल्यादेवी, स्वामी विवेकानंद व स्व.जनुभाऊ रानडे यांच्या प्रतिमांचे मान्यवरांचे हस्ते पूजन व दीपप्रज्वलन करून झाले गौतम सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केल्यानंतर शंतनू पाठक यांनी अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर  " योगिनी तू,मानिनी तू ,तूच साध्वी सोज्वला " हे पद्य सादर केले.

अध्यक्षीय समारोपात डॉ.हेमंत वैद्य यानी स्व.जनुभाऊ रानडे यांच्या सहवासाने स्वतःसह अनेक स्वयंसेवक व प्रचारकांना संघकार्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय चौधरी यांनी केले तर उपेंद्र बेल्लूरकर यांनी आभार मानले.सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.व्याख्यानास सेलू व परिसरातील सर्व स्तरातून महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button