आगामी लोकसभा निवडणुकीत स्वच्छ व निष्कलंक उमेदवारालाच निवडुन द्या.. संदीप शिंदे

महाराष्ट्र प्रदेश संघटक अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती.

जिल्हा प्रतिनिधी/
दिनांक 08/04/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये स्वच्छ व निष्कलंक उमेदवारांनाच निवडून आणावे असे आवाहन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे संदीप शिंदे महाराष्ट्र प्रदेश संघटक यांनी राज्यातील मतदारांना केले आहे.
राज्यासह देशांमध्ये कमालीचा भ्रष्टाचार बोकाळला असून सर्वच राजकीय पुढारी हे भ्रष्ट असून देशात कमालीचा भ्रष्टाचार वाढला आहे. सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून केवळ सत्तपोटी गरीब जनतेचा गळा घोटण्याचे महापाप सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी केले असून राज्यातील जनता महागाईच्या वणव्यात होरपळून निघत आहे.शासन व प्रशासन यांनी भ्रष्टाचाराच्या सीमा ओलांडल्या आहेत.राज्यासह देशात मुठभर लोकांची हुकूमशाही वाढली असून लोकशाही संपुष्टात आली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.”लोकांचे लोकांसाठी व लोकांकडून चालविले जाणारे राज्य म्हणजे लोकशाही हि लोकशाहीची व्याख्याच भ्रष्ट राजकारण्यांनी बदलून टाकली आहे.यावरुन राज्यासह देशात हुकूमशाही वाढली असून देशाची वाटचाल ही लोकशाही नव्हे तर हुकूमशाहीच्या दिशेने होत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
एक चूक दुरुस्त करण्यासाठी पाच वर्ष नव्हे तर जवळजवळ दहा वर्ष खर्ची घालावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. छोटे -छोटे अमिष दाखवून मतदारांना भुरळ पाडणाऱ्या नेत्यापासून सावधान राहून स्वच्छ चारित्र्याचे व निष्कलंक उमेदवारांनाच येत्या लोकसभा निवडणुकीत तसेच आगामी सर्वच निवडणुकीत निवडून देण्याचे महत्त्वाचे कार्य मायबाप मतदारांनी करावं असं आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.
जनतेच्या जीवावर निवडून आलेले व मोठे झालेले सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरड्याप्रमाणे अनेक रंग बदलले असल्याचे पहावयास मिळाले आहे जनतेसाठी कोणत्याच योजना अस्तित्वात नाहीत. योजना केवळ राजकीय पुढार्‍यांच्या साठीच अस्तित्वात आहेत आणि मर्यादितही आहेत. मायबाप जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ साधण्याच्या साठी सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी नेते कुठल्याही स्तराला जाण्यास तयार आहेत. त्यामुळे देशातील जनतेची पूर्णपणे वाहतात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच वर्षे निवडून आलेला आमदार, खासदार दहा पिढ्यांची कमाई करतो ही कमाई कुठून व कशी होते याचाही विचार मायबाप जनतेने करण्याची गरज निर्माण झाली आहे. जनतेने जनतेचे अधिकार मागितल्यास जनतेचा आवाज दाबण्याच महापाप सर्वच राजकीय पक्षांनी केलेले आहे. जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ आपली राजकीय पोळी शेकून घेण्यामध्ये धन्यता मानत असलेल्या एकूणच भ्रष्ट राजकीय व प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांना आता जनतेने घराचा रस्ता दाखविणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जनतेच्या हिताच्या प्रश्नांबाबत कोणतेच राजकीय पक्ष संवेदनशील असल्याचे दिसत नाही.जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास कोणताच नेता धजावत नाही. सर्वच पक्ष राजकीय लाभ स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीला व नातेवाईकांना मिळाले पाहिजे या वृत्तीचे सर्वच पुढारी आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला कोणीच वाली नसल्यामुळे जनता हतबल झाली आहे. परंतु मतदारांनी सर्वतोपरी विचार करून सत्ता कोणाला मिळवून द्यायची हा निर्णय जनतेच्या हाती आहे.आणि आता ती सुवर्ण संधी राज्यातील तसेच देशातील मायबाप जनतेच्या हाती असुन आता चुक होता कामा नये.मतदारांनी आपल्या तरुण व बेरोजगार युवकांचा विचार डोळ्यासमोर ठेवून योग्य उमेदवारालाच निवडुन देण्याचं त्यांनी म्हटले आहे.आता निर्णय मतदारांच्या हाती असल्यामुळे मतदार जनता केव्हाही अशा भ्रष्ट राजकीय पुढाऱ्यांना हद्दपार करू शकते यासाठी विचार करणे फार महत्त्वाचे आहे. आणि आता ही वेळ येऊन ठेपली आहे परिवर्तन निश्चित झाले पाहिजे तेव्हाच मायबाप जनता गुण्यागोविंदाने नांदेल अन्यथा जनतेची लक्तरे राजकीय पुढार्‍यांनी आधीच वेशीला टांगलेली आहेत उरले -सुरले त्याचीही वाताहत लागल्याशिवाय राहणार नाही.याचा सारासार विचार करून आगामी निवडणुकीमध्ये स्वच्छ चारित्र्य व जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला नेता आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेणारा उमेदवार असेल त्यालाच मतदान करावे अन्यथा ‘येरे माझ्या मागल्या’ किंवा ‘नळी फुंकली सोनारे,इकडुन तिकडे गेले वारे” या म्हणी प्रमाणे त्याची पुनरावृत्ती होऊ नये असेही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री वसंतराव देशमुख यांनी म्हटले आहे.
दलबदलू व सरड्यासारखे रंग बदलणारे पुढारी हद्दपार करावेत व जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे उमेदवार येत्या निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र संघटक संदीप शिंदे यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button